मुंबई : पोलिस स्मृती दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावून पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. या प्रसंगी गेल्या वर्षभरात देशसेवेत प्राण अर्पण करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी कृतज्ञतेने अभिवादन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, देशाच्या सुरक्षेसाठी अखंड निष्ठा आणि धैर्याने सेवा करणाऱ्या ३४ अधिकारी आणि १५७ पोलिस कर्मचाऱ्यांसह १९१ शूर वीरांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय आहे. त्यांचा पराक्रम आणि जबाबदारीची जाणीव प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात शहीद पोलिसांच्या नावांचे उच्चारण करण्यात आले. त्यानंतर पोलिस बँडने श्रद्धांजलीपर सलामी दिली, तसेच वर्दीधारी जवानांनी ताठ मानेने आदर व्यक्त केला. तीन तोफांच्या गर्जनेसह स्मारक परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेला.
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचा त्याग आणि शौर्याबद्दल मनापासून आदर व्यक्त केला. या वेळी उपस्थित मान्यवर, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आमंत्रित अतिथींशीही त्यांनी संवाद साधून शहीद जवानांच्या कार्याचा गौरव केला.