नागपूर: नागपूरमध्ये शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत इटवारी रेल्वे स्थानकासमोरील भारती आखाडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १८ जुगारींना अटक करण्यात आली असून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त नित्यानंद झा यांच्या देखरेखीखाली एनडीपीएस पथकाने केली. मुख्य आरोपी अशोक यादव उर्फ बाबाजी याच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोकड, मोबाईल, दुचाकी, पत्ते आणि इतर साहित्य असा एकूण ₹७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी अशोक यादव याच्यावर पूर्वी दहा गुन्हे नोंदले असून त्याच्यावर तडीपारची कारवाईही झाली आहे. काही आरोपींवर एनडीपीएस आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एनडीपीएस पथक आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही धडक मोहीम यशस्वी ठरली. पोलिस आयुक्तांच्या “गुन्हे, जुगार आणि अवैध कृत्यांविरोधात शून्य सहनशीलतेची नीति” अंतर्गत नागपूर पोलिसांचे अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.










