नागपूर – शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इनर रिंग रोड परिसरात सकाळी ८.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स बसना रस्त्यावर पार्किंग, पिकअप आणि ड्रॉप करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस उपआयुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कार्यालयाचा जावक क्र. पोउपआ/वावि/नागपूर/ट्रॅव्हल्स बस अधिसूचना/3632/2025 दिनांक 12.09.2025 अन्वये ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
तथापि, पोलिसांच्या वारंवार सूचना देऊनही काही ट्रॅव्हल्स चालक नियमांचे उल्लंघन करून आपल्या बसेस रस्त्यावरच पार्किंगसाठी उभ्या करतात किंवा प्रवाशांचे पिकअप-ड्रॉप करतात. या नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारे वारंवार कारवाई झालेल्या ट्रॅव्हल्स बसेसच्या परवान्यांचे (परमिट) रद्द करण्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात येईल. तसेच त्या वाहनांची जप्ती करण्याचीही कारवाई हाती घेतली जाईल.
डीसीपी लोहित मतानी यांनी सर्व ट्रॅव्हल्स चालकांना वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.