मुंबई : बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपवर विक्री, उत्पादन आणि वितरणाची पूर्ण बंदी घातली आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हे सिरप कोणत्याही मेडिकलमध्ये विक्रीसाठी आढळल्यास नागरिकांनी एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात सुरू झाला होता वाद-
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात काही चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तपासात ‘कोल्ड्रिफ’ सिरप कारणीभूत असल्याचे समोर आले. या सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकोल’ (DEG) नावाचा विषारी घटक आढळल्याने मुलांच्या किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत १८ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातही वाढवली खबरदारी-
या घटनेनंतर महाराष्ट्रात औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील मेडिकल्स आणि घाऊक औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. संशयास्पद औषधांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
एफडीएचे सहआयुक्त मनीष चौधरी यांनी सांगितले, “नागपूर आणि परिसरात आतापर्यंत ‘कोल्ड्रिफ’ सिरपचा साठा आढळलेला नाही. मात्र सर्व घाऊक विक्रेत्यांवर देखरेख ठेवण्यात येत आहे.”
वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा-
डॉ. मनीष तिवारी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर) यांनी सांगितले, “या सिरपमधील रासायनिक घटकांमुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पाच वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप देताना खबरदारी घ्यावी.”
आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी स्पष्ट केले की, “विदर्भात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही. पण सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.”
नागरिकांसाठी सूचना-
राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘कोल्ड्रिफ’ सिरपचा कोणताही साठा, विक्री किंवा वितरण दिसल्यास त्वरित एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर तपासणी सुरू असून, दोषी औषध सापडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.