नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार केलं आहे, तर इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांचं नाव पुढे केलं आहे. कोणता उमेदवार विजयी ठरणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं मत निर्णायक ठरू शकतं.
संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला-
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर सडकून टीका केली. “पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास केंद्र सरकारने परवानगी देणं हे शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “पहेलगाममध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना विचारलं का? त्यांच्या भावना जाणून घेतल्या का?” अशी खरमरीत टीका राऊतांनी केली.
जय शाह यांच्यावरही निशाणा-
यावेळी त्यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “एका बाजूला सैनिक सीमारेषेवर रक्त सांडत आहेत, तर दुसरीकडे जय शाह दुबईत बसून भारत-पाक सामन्याचा थाटामाट उपभोगणार. देशभक्तीचा डंका वाजवणारे नेते क्रिकेटच्या नावाखाली पाकिस्तानसोबत व्यापार करतील, हे जनतेला मान्य होणार नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
इंडिया आघाडीला ठाकरे गटाचा पाठिंबा-
दरम्यान, ठाकरे सेना एनडीएऐवजी इंडिया आघाडीच्या उमेदवारासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्व मिळून सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला असून उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आम्ही या प्रक्रियेत सहभागी आहोत.
राऊतांनी यावेळी उघड केलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एनडीए उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी फोन केला होता. मात्र, पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर ठाकरे गटाने इंडिया आघाडीकडे झुकत असल्याचे संकेत दिले.