नागपूर : उन्हाळ्यात पूर्णपणे आटलेला सोनगाव तलाव पावसाळ्यातही जिवंत झाला नाही. उलट तलावातील मासे मरत आहेत. स्थानिक रहिवाशांचा संताप उफाळला असून, “कोट्यवधी रुपये खर्च करूनही तलावाची खरी स्थिती बदललेली नाही. फक्त सौंदर्यीकरण झाले, पण पर्यावरणीय पुनरुज्जीवनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले,अशी जोरदार टीका होत आहे.यासंदर्भात स्वत्रंत पत्रकार अंजया अनपार्थी यांनी ‘नागपूर टुडे’ शी संवाद साधत भाष्य केले.
पैशांचा ओघ – पण निकाल शून्य-
सोनगाव तलावावर मागील पंधरा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण त्याचा परिणाम काय झाला पाहूया.
2010 : शासनाकडून ₹३.२४ कोटी मंजूर. कामं – गाळ काढणे, मूर्तिस विसर्जन टाकी, ओव्हरफ्लो मेकॅनिझम, तटबंदी दुरुस्ती.
2012 : मनपा प्रशासनाने तलाव खाजगी मालकांकडून संपादन करण्याचा ₹५.१३ कोटींचा आराखडा तयार केला. पण कायदेशीर अडचणी आल्या.
2017 : राज्य सरकारने ₹१८.२ कोटींचा भव्य ‘ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट’ मंजूर केला. यात नक्षत्र उद्यान, वॉकिंग ट्रॅक, पर्गोला, लाईटिंग, पार्किंग आणि हरितपट्टा यांचा समावेश.
2021 : कायदेशीर वाद मिटल्यानंतर भूमिपूजन आणि प्रकल्पाला हिरवा कंदील.
2023 : महाराष्ट्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यासाठी ₹२४.९६ कोटी मंजूर, त्यातील पहिली हप्त्याची रक्कम ₹८.२५ कोटी सोडण्यात आली. यात संरक्षक भिंती, लॉन्स, फ्लडलाईट्स, छोटे बगीचे, भेट देणाऱ्यांसाठी सुविधा यांचा आराखडा. मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य.
2025 (मे) : मनपाकडून नवा आराखडा – रिक्रिएशन सेंटर, अॅम्फीथिएटर, सार्वजनिक जागा, शौचालये, वाय-फाय, बसण्याची व्यवस्था. निधी अमृत २.० योजनेतून आणि वित्त आयोगाकडून.
तलावाची खरी अवस्था-
सर्व आराखडे, भूमिपूजनं आणि कोट्यवधींचा खर्च असूनही सोनगाव तलाव आजही कोराच आहे. पावसाळ्यात पाण्याने भरायला हवा असलेला तलाव रिकामाच आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, फक्त डेकोरेशन झालं; जैवविविधता, पाणीसाठा आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
रहिवासी म्हणतात, आम्हाला पायवाटा, लाईट्स आणि गार्डन नकोत. तलाव पाण्याने भरलेला हवा आणि त्यात मासे, किनारपठ्ठीवर पक्षी परत यायला हवेत. पण योजनांची दिशा चुकीची गेली आहे.