नागपूर : शहरातील तहसील पोलिसांनी दोन शातिर आंतरराज्यीय वाहन चोरांना अटक करून तब्बल ४१ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही टोळी नागपूर शहरातून गाड्या चोरून त्या मध्य प्रदेशात नेऊन विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
या टोळीचा सूत्रधार कुख्यात वाहन चोर प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी हा सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. प्रल्हादवर मध्य प्रदेशातही अनेक गुन्हे नोंद आहेत. शहरातील वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, दहा दिवसांपूर्वी डागा रुग्णालयाजवळ चोरीच्या दुचाकीवर जात असताना त्याला पकडण्यात आले. त्यावेळी त्याच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी १० चोरीच्या गाड्या जप्त केल्या होत्या.
पुढील चौकशीत, प्रल्हादने पोलिसांना सांगितले की, तो नागपूर शहरातून दुचाकी चोरून आपल्या सिवनी येथील साथीदार ब्रजकिशोर चंद्रवंशी याच्याकडे नेऊन सोडत असे. त्यानंतर ब्रजकिशोरच त्या वाहनांची विक्री करत असे. पोलिसांनी या दोघांच्या माहितीच्या आधारे आतापर्यंत ४१ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यापैकी ३२ गाड्या नागपूर शहरातून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.