नागपूर : वाठोडा पोलिसांनी ४२ वर्षीय व्यक्तीविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला संगीता शंकरराव बिसेन (वय ३२) हिचा विवाह एप्रिल २०१४ मध्ये आरोपी शंकरराव श्रीपाद बिसेन यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे सर्व काही सुरळीत असले तरी एप्रिल २०१६ पासून आरोपीकडून घरगुती कारणांवरून आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी संगितावर मानसिक तसेच शारीरिक छळ सुरू झाला.
२४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास छोटीतरोडी येथील राहत्या घरात संगिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुरुवातीला हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र मृत महिलेचा भाऊ अंकित केशव खौशी (राहणार छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि पुढील तपासात दीर्घकाळ चाललेल्या छळामुळेच संगिताने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
यानंतर वाठोडा पोलिसांनी आरोपी शंकरराव श्रीपाद बिसेन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ८५ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.