नागपूर – शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समर्थ नगरीत एका वृद्ध दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ८० वर्षीय होमिओपॅथी डॉक्टर गंगाधर बालाजी हरणे यांनी त्यांच्या ७० वर्षीय पत्नीसोबत विष प्राशन केलं. यामध्ये डॉक्टर हरणे यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी निर्मला हरणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना समर्थ नगरीतील प्लॉट क्रमांक १०४ येथे घडली. गंगाधर हरणे हे गेल्या काही महिन्यांपासून पोट आणि दातांच्या गंभीर आजारांनी त्रस्त होते. अनेक उपचार सुरू असतानाही त्यांना अपेक्षित आराम मिळत नव्हता. या आजारपणाला आणि एकटेपणाला कंटाळून त्यांनी पत्नीसोबत बुधवारी सकाळी विष प्राशन केलं.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असं नमूद केलं आहे. हरणे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा झारखंडमधील स्टील प्लांटमध्ये काम करतो, तर मुलगी लग्न होऊन एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. दोघेही घराबाहेर असल्याने वृद्ध दाम्पत्य घरात एकटेच राहत होते.
ही घटना समजताच शेजाऱ्यांनी लगेचच त्यांच्या मुलीला आणि पोलिसांना माहिती दिली. मुलगी तत्काळ घरी पोहोचली आणि तिने आई-वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी गंगाधर हरणे यांना मृत घोषित केलं, तर निर्मला हरणे यांची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्य आणि सामाजिक आधाराच्या अभावावर गंभीर प्रश्न निर्माण करते.