वर्धा : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महत्त्वाचे संकेत दिले.
फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा काही अंशी अधिकार कार्यकर्त्यांना दिला जाईल. जिथे अडचणी आहेत, तिथे समन्वय ठेवून चर्चा करा. मात्र, महायुती न झाल्यासदेखील मित्रपक्षावर टीका टाळावी.”
ते पुढे म्हणाले, “आपण 2017 मध्ये बघितलंय की, सत्ता असूनही शिवसेनेनं आपल्यावर वारंवार टीका केली. तसं वर्तन आपण करू नये. महायुतीच्या बाहेरही, लढाई मैत्रीपूर्ण असावी. परंतु जिथे लढतो आहोत, तिथे भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवायला हवं.”
फडणवीसांनी अंतर्गत वादांवरही भाष्य करत कार्यकर्त्यांना एकीचं आवाहन केलं. “भाजप हा एक परिवार आहे. कधी कधी भावा-भावांमध्ये मतभेद होतात, पण निवडणुकीच्या तोंडावर ही भिंत नाहीशी झाली पाहिजे. छोट्या छोट्या वादांमुळे अनेक पक्षांचा अंत झाला आहे. जर कोणी पक्षविघातक वागणूक ठेवत असेल, तर त्याला पक्षच योग्य तो प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीचे उदाहरणही दिले. 22 जुलै रोजी पक्षाध्यक्षांच्या आदेशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एका दिवसात 78 हजार रक्ताच्या बाटल्या जमा केल्या. याआधी शिवसेनेने 25 हजारांचा विक्रम केला होता. हे दाखवून देतं की, आपण ठरवलं तर असाध्यही साध्य करू शकतो.फडणवीसांच्या या भाषणातून स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने एकाच वेळी आक्रमकता, संयम आणि संघटनशक्ती या तीनही बाबींवर भर दिल्याचं स्पष्ट दिसत आहे.