नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. संसदेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशात नवा उपराष्ट्रपती कोण होणार, यावर चर्चेला वेग आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मातब्बर नेत्याचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे संभाव्य उमेदवार?
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक वर्षांच्या राजकीय अनुभवामुळे आणि संघटनात्मक पार्श्वभूमीमुळे त्यांचा विचार केला जात असल्याचं बोललं जात आहे.
हरिभाऊ बागडे यांनी फुलंबरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांना सर्वसामान्य जनता ‘नाना’ या नावाने ओळखते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरिभाऊंचं बालपण अतिशय हलाखीचं होतं. कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांनी तरुणपणी औरंगाबाद जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रीही केली होती. शेतीविषयक प्रेमामुळे त्यांना ‘कृषी योग’ हे विशेष नाव मिळालं होतं.
राजकीय प्रवास : साधेपणातून नेतृत्वाच्या शिखरापर्यंत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेल्या हरिभाऊ बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 रोजी झाला. 1985 मध्ये त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकून विधीमंडळात प्रवेश केला. 1995 मध्ये त्यांना रोजगार हमी योजनेच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
2009 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण 2014 आणि 2019 मध्ये ते पुन्हा फुलंबरीमधून आमदार म्हणून निवडून आले. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.
काय हरिभाऊ बागडे ठरणार भारताचे पुढचे उपराष्ट्रपती?
धनखड यांचा अचानक राजीनामा आणि सत्तारूढ पक्षाच्या अंतर्गत हालचाली पाहता, हरिभाऊ बागडे यांचे नाव अधिकाधिक चर्चेत येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात आणि संघ परिवारामध्ये त्यांना असलेली मान्यता, त्यांचा साधा स्वभाव आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेता त्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.