नागपूर: पश्चिम नागपूरचे आमदार तसेच नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील ८४ झोपडपट्ट्यांमधील पट्टे वाटपाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभाग, नागपूर महानगरपालिका (मनपा) आणि नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील पात्र झोपडपट्टीवासीयांना तातडीने पट्टे वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल, मनपा आणि नासुप्रचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकृत आकडेवारीनुसार, पश्चिम नागपूरमध्ये एकूण ८४ झोपडपट्ट्या असून त्यापैकी ११ झोपडपट्ट्यांतील बहुतांश रहिवाशांकडे पट्टे आहेत. उर्वरित ७३ झोपडपट्ट्यांचे मनपामार्फत सर्वेक्षण पूर्ण झाले असून बहुतेक ठिकाणी ‘प्लेन टेबल सर्व्हे’ देखील पार पडले आहेत.
आ. ठाकरे यांनी म्हटले आहे की, महसूल विभाग, मनपा व नासुप्रच्या मालकीच्या जमिनीवरील पात्र झोपडपट्टीवासीयांना लवकरच पट्टे देण्यात येतील. झुडपी जंगलातील झोपडपट्ट्यांची स्वतंत्र यादी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असून, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे धोरण ठरविल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.
नासुप्रच्या मालकीच्या भूखंडांवरील झोपड्या आणि झुडपी जंगलातील भूभाग यांची अचूक सीमारेषा निश्चित करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. अंबाझरी आणि पांढराबोडी येथील झोपडपट्ट्यांमध्ये हे सर्वेक्षण सध्या सुरू आहे.
यावेळी आ. ठाकरे यांनी मानकापूर येथील राजनगर व सन्त सोसायटीमधील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन एसआरए (स्लम पुनर्विकास प्रकल्प) किंवा पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना) योजनेंतर्गत करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आणि नासुप्रला अशा योजनांसाठी आवश्यक जागा शोधण्याचे निर्देश दिले, जेणेकरून या झोपडपट्टीवासीयांसह पश्चिम नागपूरमधील इतर गरजू नागरिकांनाही घरे उपलब्ध करून देता येतील.
(छायाचित्राखालील कॅप्शन: आमदार विकास ठाकरे यांनी सन्त सोसायटी, मानकापूर येथील रहिवाशांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.)
(झोपडपट्ट्यांची यादी आणि त्यांची सद्यस्थिती यासह तपशीलवार अहवाल प्रेसनोटसोबत संलग्न आहे.)