नागपूर : विदर्भातील नागपूर जिल्ह्याला जोडणारा इतवारी–उमरेड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, जुलै महिन्यात या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील नैरो गेजवरून ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित होणारी एक महत्त्वाची आणि नव्या प्रकारातील रेल्वे लाइन ठरणार आहे.
महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसीएल) ने इतवारी ते उमरेड दरम्यानचा ५५ किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण केला आहे. आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाचे निरीक्षण होणार असून, जून अखेरीस हे निरीक्षण पार पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलैपासून या मार्गावर मालगाड्यांची वाहतूक सुरू होणार आहे.
सुरुवातीला या मार्गाचा वापर कोळसा वाहतुकीसाठी केला जाणार आहे. उमरेडमधील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) ला याचा थेट फायदा होणार असून, कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पांपर्यंत केवळ चार तासांत कोळसा पोहोचवता येणार आहे, ज्यासाठी यापूर्वी २२ तास लागत होते.
एनटीपीसी मौदा आणि अदाणी तिरोडा वीज प्रकल्पांपर्यंतही या मार्गाचा लाभ होऊ शकतो. तसेच या मार्गामुळे उमरेड आणि कुही तालुक्यातील नागरिकांना नागपूरकडे प्रवास करणं, शेतमाल वाहून नेणं अधिक स्वस्त व सोयीचं होईल.
या रेल्वे प्रकल्पाची सुरुवात डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. २०१३-१४ मध्ये प्रकल्पास मंजुरी मिळाली होती, मात्र निधीअभावी, कोविड-१९ महामारी आणि वन विभागाच्या अडचणींमुळे कामाला विलंब झाला. राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमातून एमआरआयडीसीएल तर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे.
इतवारी–नागभीड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा एकूण १०६ किलोमीटरचा टप्पा प्रस्तावित असून, त्यापैकी इतवारी ते उमरेडपर्यंतचे ५५ किमी काम पूर्ण झाले आहे. उमरेड ते भिवापूर (१२ किमी) हा टप्पाही अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
हा रेल्वे मार्ग नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी विकासाची नवी दिशा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.