Published On : Wed, Jun 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्यात वाढतोय कोरोनाचा धोका;नागपूरमध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

नागपूर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढताना दिसत असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी २४ तासांच्या कालावधीत राज्यात ८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूरमध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामागे इतर आजार कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका रुग्णाला HIV व क्षयरोग होता, तर दुसऱ्याला मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर समस्या होत्या. नागपूरमध्ये आतापर्यंत १७ कोरोना रुग्ण आढळले असून, त्यापैकी ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Gold Rate
1 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,17,100 /-
Gold 22 KT ₹ 1,08,900 /-
Silver/Kg ₹ 1,45,800/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यभरात सध्या ५९० अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, मंगळवारी ४३५ रुग्णांनी पूर्णतः बरे होऊन घरी परतण्याचा दिलासा मिळवला. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे. यामध्ये सात रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे, मात्र तो सध्या शहरात वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कामा रुग्णालयाने ३० खाटांचे विशेष कोरोना युनिट तयार केले आहे. प्राणवायू प्रणाली, मॉनिटरींग यंत्रणा आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा असलेल्या या कक्षातून महिला व बालकांसाठी योग्य उपचार दिले जाणार आहेत.

देशपातळीवरही रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या भारतात ४,०२६ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद आहे. महाराष्ट्रात ५१० रुग्ण असून, प्रशासनाने जनतेला काळजी घेण्याचं आणि गरज असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलं आहे.

Advertisement
Advertisement