नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, सध्या देशभरात २५७ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही वाढ सौम्य असली तरी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दक्षिण भारतात वाढता धोका-
कोरोनाची लागण विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये वाढत आहे. मागील एका आठवड्यात महाराष्ट्रात एकट्यात ४४ नवीन रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकतीच आकडेवारी अद्ययावत केली असून, ती आता अधिक अचूकपणे ऑनलाईन डॅशबोर्डवर पाहता येते.
नवीन प्रकारावर नजर-
कोविडचा JN.1 हा नवीन प्रकार ऑगस्ट २०२३ मध्ये आढळून आला होता. WHO ने त्याला ‘variant of interest’ म्हणून वर्गीकृत केलं आहे. सध्या LF.7 आणि NB.1.8 हे प्रकारही चर्चेत आहेत, मात्र ते गंभीर स्वरूपाचे नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
आशियातील लाट भारतात पोहोचतेय का?
सिंगापूर, थायलंड, आणि हॉंगकॉंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं असून, याचा संभाव्य प्रभाव भारतावरही पडू शकतो. सिंगापूरमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तब्बल १४,००० हून अधिक रुग्ण नोंदले गेले आहेत.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर, स्वच्छता, आणि गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण. हे सर्व उपाय पुन्हा पाळणं आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.