नागपूर : नागपूर शहरात देह व्यापाराला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एका फ्लॅटवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. यादरम्यान छाप्यात एका महिलेला अटक करण्यात आली असून एक पुरुष आरोपी अद्याप फरार आहे. घटनास्थळी दोन पीडित महिला सापडल्या असून त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर 14 मे 2025 रोजी सायंकाळी 4:12 वाजता ते रात्री 11:45 दरम्यान साईबाबा नगर, खरबी रोड येथील मुरली माधव अपार्टमेंट नं. 1 च्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक A मध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी नूतन सचिन काळसर्पे (वय 32) ही महिला घटनास्थळी मिळून आली, तर दुसरा आरोपी सचिन मनोहर काळसर्पे हा पसार झाला आहे. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण 28,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींनी पीडित महिलांना आर्थिक फायद्याच्या आमिषाने फसवून, देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती आणि त्यांच्याकडून अनैतिक कृत्य करवून घेतले जात होते. पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना संरक्षणात ठेवण्यात आले आहे.पुढील तपास सुरू असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक सक्रिय झाले आहे.