नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलीत करण्यासाठी आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात २१ प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार हे सर्वेक्षण सुरु आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधींचा देखील समावेश होतो. वयाच्या ५० ते ६० वर्षात दिव्यांगत्वाचा धोका वाढतो. या वयातील कोणत्याही व्यक्तीला अंधत्व (Blindness), कर्णबधिरता (Hearing Impairment), कम्पवात (Parkinsons Disease), स्मृतीभ्रंश (Mental Illness) ही समस्या असेल तर त्यांनी ती माहिती सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या आशा सेविकांना द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार २१ प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार नागपूर शहरात दिव्यांग व्यक्तींचे होम टू होम सर्वेक्षण करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या पुढाकारातून तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण कार्य सुरु आहे.
आतापर्यंत १२.८३ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश शहरातील दिव्यांग बांधवांची २१ प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार जीवनचक्रावर आधारित वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणे हा असून, याच्या आधारे पुढील ५ वर्षांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. या कृती आराखड्याच्या आधारे दिव्यांग नागरिकांसाठी प्रभावी योजना, सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल.
महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेद्वारे सर्वेक्षणासाठी मनपाच्या आशा सेविकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सर्वेक्षणाकरिता मनपाच्या आशा सेविका प्रत्येक घरी भेट देऊन माहिती गोळा करीत आहेत. घरात जन्मतः, अपघाताने, आजाराने, वंशपरंपरेने किंवा वयोमानामुळे आलेले कोणतेही दिव्यांग व्यक्ती यांची माहिती आशा सेविकांना देण्यात यावी. दिव्यांगांसाठीच्या योजना, सेवा आणि सुविधांना लाभ मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांची जबाबदारीची भूमिका आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आशा सेविकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
दिव्यांगत्वाचे २१ प्रकार
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्वाचे एकूण २१ प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, ते पुढीलप्रमाणे :
१. दृष्टीदोष (Visual Impairment
२. श्रवणदोष (Hearing Impairment)
३. बोलण्यात अडचण (Speech Impairment)
४. शारीरिक अपंगत्व (Locomotor Disability)
५. मानसिक आजार (Mental Illness)
६. बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability)
७. स्वमग्नता / आत्मकेंद्री विकार (Autism Spectrum Disorder)
८. सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy)
९. बहुविकलांगता (Multiple Disabilities)
१०. डीएसएलडी – भाषा आणि बोलण्याचा विकासात उशीर (Developmental Speech and Language Disorder)
११. शिक्षण विकार (Specific Learning Disabilities – Dyslexia, etc.)
१२. मायोपिया / दृष्टिदोष (Low Vision / Myopia)
१३. अपस्मार / फिट्स (Epilepsy)
१४. मांसपेशींचा आजार (Muscular Dystrophy)
१५. हाडांचा विकार (Skeletal Dysplasia)
१६. मुलांची वाढ खुंटणे (Dwarfism)
१७. जैविक दोष (Neurological Disorder)
१८. थॅलेसेमिया (Thalassemia)
१९. हेमोफिलिया (Hemophilia)
२०. सिकल सेल आजार (Sickle Cell Disease)
२१. बहिःप्रेरित अपंगत्व (Acid Attack Victim)