नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यंदा एकूण निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने ९६.७४ टक्क्यांसह राज्यात सर्वाधिक निकाल नोंदवला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९.४६ टक्के राहिला. निकालात मुलींची कामगिरी यंदाही मुलांपेक्षा सरस ठरली आहे.
शाखानिहाय निकालावर नजर टाकल्यास, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के लागला असून, यावर्षीही विज्ञान विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. देशातील स्पर्धा परीक्षांकडे वाटचाल करणाऱ्या या शाखेतील विद्यार्थ्यांचा हा निकाल त्यांना मोठी उभारी देणारा ठरेल.
वाणिज्य शाखेचा निकाल ९२.६८ टक्के लागला आहे. आर्थिक व्यवस्थापन, अकौंटिंग आणि बिझनेस स्टडीजमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल समाधानकारक ठरला आहे. यंदा व्यवसाय शिक्षण शाखेनेही ९३.२६ टक्क्यांचा चांगला निकाल नोंदवून आपल्या महत्त्वाची नोंद ठेवली आहे.
दुसरीकडे, कला शाखेचा निकाल ८०.५२ टक्के इतका राहिल्याने तो तुलनेने सर्वात कमी असल्याचे दिसते. मात्र, ह्याच शाखेतून साहित्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र अशा अनेक क्षेत्रांतील जाणकार तयार होतात, त्यामुळे या निकालाकडे केवळ टक्केवारीच्या आधारे पाहणे चुकीचे ठरेल.
ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) विद्यार्थ्यांचा निकाल ८२.०३ टक्के लागला असून, कौशल्याधिष्ठित शिक्षणाकडे झुकणाऱ्या विद्यार्थ्यांचीही कामगिरी समाधानकारक राहिली आहे.
एकूणच, राज्यातील सर्वच शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून, विज्ञान व वाणिज्य क्षेत्रात विशेष चमक दिसून आली आहे. तरीही कला व ITI शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक धोरणे अधिक सक्षम आणि प्रोत्साहनात्मक असावीत, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.