नागपूर : नागपूर विमानतळावरून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघडकीस आली आहे. हवाई मार्गाने पार्सलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या १० किलो २८ ग्रॅम गांजाचा साठा कार्गो विभागात सापडला, ज्याची अंदाजित किंमत २ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हे पार्सल ओडिशाहून दिल्लीमार्गे उत्तर प्रदेशला पाठवले जात होते. विशेष म्हणजे या पार्सलवर प्रोटीन पावडरचा लेप लावून गांजाला लपवण्यात आले होते.
विमानतळाच्या कार्गो विभागातील डोमेस्टिक स्क्रीनिंग मशीनवर नियमित तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना संशय आला. तत्काळ याची माहिती सुरक्षा व्यवस्थापकांना देण्यात आली आणि त्यांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पार्सलची तपासणी केली असता, लाल-पीळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ आढळून आला.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पार्सलवरील डिलिव्हरी स्टीकरवर “राहुल फिटनेस, छापड़िया एलजी शोरूम रोड, इंदिरा चौक, कांता बेनजी, ओडिशा” असे नाव नमूद होते.या प्रकरणामुळे विमानतळावर खळबळ उडाली आहे. पोलिस आता पार्सल पाठवणारा आणि घेणाऱ्याचा तपशील शोधून काढत आहेत.