नागपूर : राज्यात सत्ताधाऱ्यांकडून ओबीसी विरुद्ध मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. यामुळे समाजात सामाजिक अशांतता पसरली आहे. यादरम्यान ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नागपुरात २८ डिसेंबरला होणाऱ्या काँग्रेसच्या जाहीर सभेच्या निमित्ताने पटोले नागपुरात आहेत.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकार निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे समाजात विषमता पसरली आहे. याचा थेट फटका उद्याोग क्षेत्राला बसला असून ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्याोग राज्याबाहेर गेले. ‘फोडा आणि राज्य करा’ हे भाजपचे धोरण असल्याचा घणाघात पटोलेंनी केला.
आपल्या निवडणूक निकालाच्या सर्वेक्षणात एका खासगी संस्थेने केलेल्या मतदानपूर्व जनमत चाचणीत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याही पेक्षा जास्त जागा आघाडीला मिळतील. नागपूरची जाहीर सभा झाल्यावर वातावरण बदलणार, असा दावाही पटोले यांनी केला.
दरम्यान यावेळी पटोले यांच्यासह माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ.वजाहत मिर्झा, प्रमोद मोरे आणि प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.