नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) यंदाच्या विजयादशमी उत्सवात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आरएसएसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
24 ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र शंकर महादेवन यांच्याकडून अद्यापही यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
2022 मध्ये एव्हरेस्ट जिंकणारे पद्मश्री संतोष यादव यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनवण्यात आले होते. दोनदा एव्हरेस्ट सर करणारी संतोष यादव ही पहिली महिला गिर्यारोहक आहे.या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका महिलेला प्रमुख पाहुणे बनवण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंपरेने विजयादशमी उत्सवाचे आयोजन करत आला आहे. यंदाही या सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.
संघाकडून विजयादशमी साजरी करण्याची परंपरा – दसऱ्याच्या दिवशी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती.नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात येते.