नागपूर : टोमॅटोनंतर आता हळदीच्या बाजारात मोठी तेजी आली. हळदीचे भाव एकाच महिन्यात जवळपास दुप्पट झाले. आता नव्या लागवडी संपल्या. पण यंदा हळदीच्या लागवडीत घट झाल्याने हळदीचा भाव २०० रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. बर्याच पारंपारिक पाककृतींमध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्या मसाल्यात, विशेषत: भारतीय पाककृतींमध्ये हळदी अनन्यसाधारण महत्त्व आहे. घाऊक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हळद उत्पादक भागात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास 25 टक्के पिकांचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यांपासून हळदीचे भाव वाढले आहेत. मे महिन्यात हाच भाव त 70 ते 80 रुपये प्रति किलो होता.
7 ऑगस्ट रोजी हळदीच्या घाऊक किमती 160-200 रुपये प्रति किलोच्या पातळीपर्यंत पोहोचल्या.हळदीला सलग दोन वर्षे भाव कमी मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी २०२२-२३ च्या हंगामात हळद लागवड कमी केली. तसचं हळद पिकाला काढणीच्या काळात पावसाचा फटका बसला होता. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हळद उत्पादक भागात मार्च आणि एप्रिलमध्ये फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणामुळेही उत्पादनात घट आली.
2010-11 मध्ये हळदीच्या किमती 300 रुपये प्रति किलो इतका विक्रमी होता. तथापि, त्यानंतरच्या वर्षांत, किमती घसरल्या आणि घाऊक बाजारात हळद 60 ते 70 रुपये प्रति किलो रुपयाने मिळायची. देशात २०२१-२२ च्या हंगामात १२ लाख २३ हजार टन हळद उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात हळद उत्पादनात वाढ झाली होती. पण बाजारभाव दबावात आल्याने चालू हंगामात शेतकऱ्यानी लागवडी कमी केल्या. त्यामुळे २०२२-२३ च्या हंगामात देशात ११ लाख ६१ हजार टन हळद उत्पादन झाल्याचे मसाला बोर्डाने म्हटले आहे. म्हणजेच चालू हंगामात देशातील हळद उत्पादन ४ टक्क्यांनी कमी झाले. देशात हळद उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ९० हजार टनांनी कमी होऊन २ लाख ७८ हजार टनांवर आले. तर तेलंगणातील उत्पादनात काहीशी वाढ झाली होती.