नागपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची म्हणजे कंजंक्टिवायटिसची (नेत्रश्लेष्मला) साथ पसरली आहे. मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांतील नेत्ररोग विभागात १०० पैकी २५ रुग्ण कंजंक्टिवायटिसचे आहेत. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ ३८० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र या आकड्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे.
साधारणतः वातावरणतील आद्रतेमुळे संसर्गाच्या प्रसारास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
डोळे लाल होणे, डोळ्यात आग होणे, डोळे दुखणे, डोळे सुजणे, डोळ्यातून स्त्राव होणे, धूसर दिसणे अशी याआजाराची लक्षणं आहेत. संसर्ग होऊ नये याकरिता नियमीत स्वच्छता राखावी, नियमित हात धुवावे, डोळ्याला वारंवार हात लावू नये, दुसऱ्यांच्या वस्तू वापरु नयेत. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.