नागपूर : सोशल मीडियावर मैत्री झालेल्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरोधात अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, अजनी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. ऋषी रमेश अडीकने (२०) रा. जगनाडे चौक असे आरोपीचे नाव असून त्याने २०२१ मध्ये तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. यादरम्यान तो तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला.
शाळेत येता-जाताना तिचा पाठलाग करीत होता. मोबाईलने तिचे छायाचित्र काढत होता. याबाबत समजताच तरुणीने त्याला सर्व छायाचित्र ‘डीलिट’ करण्यास सांगितले होते. हे सर्व करण्यासाठी तरुणाने होकार दिला. एकेदिवशी तरुणाने मुलीला अजनी परिसरात भेटायला बोलावले.
तेथे तरुणीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तरुणी घटनेबाबत कुटुंबीयांना माहिती देऊन अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपी ऋषीचा शोध सुरु केला आहे.