मुंबई – राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावर पवारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केले . ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असे कसे चालेल? असे फडणवीस म्हणाले होते. यावर अज्ञातापोटी ते असे स्टेटमेंट करतात.
मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवले. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल.1977 साली आम्ही सरकार बनवले पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. ते लहान होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना कळले नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नाही , असा तिखट शब्दात पवार यांनी फडणवीसांवर पलटवार केला.