नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे केंद्रासह राज्य सरकारवरही सातत्याने ताशेरे ओढत असतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशभक्त असा उल्लेख केला होता. यावरून पटोले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नागपूरमधील एका बड्या नेत्यावरही निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना देशप्रेमी म्हणत असतील तर देशप्रेमीची व्याख्या काय आहे ते सांगावे, असा उलट सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.
मोदी सरकारविरोधात राज्यातला कोणताही नेता बोलू शकत नाही. नागपूरचे काही नेते बोलत होते, परंतु तेही आता “मूग गिळून गप्प” झाले आहेत, असेही पटोले म्हणाले. तेही बोलू शकत नाहीत. नाना पटोलेंच्या बोलण्याचा रोख केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मोदी सरकारने सरकारने देशाची किती संपत्ती विकली हे त्यांना माहिती नसेल तर आम्ही ती थोड्याच दिवसात जाहीर करणार आहोत, असा इशाराही पटोले यांनी दिला. मोदींनी काय काय विकले? कोणाला विकलं? कोणत्या मित्रांना विकलं? याबाबतची यादी जाहीर करू, असेही ते म्हणाले. मुळात देश विकण्यासाठी, संविधान संपवण्यासाठी यांना सत्ता दिली होती का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. याच मुद्द्याला काँग्रेस उचलून धरणार असल्याचे पटोले म्हणाले.