दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. मात्र यंदा आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागले आहे. हा सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचे राजकारण करायचे नसते तरीही ते केले जात आहे असे म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरीचे प्रकारही झाले होते. मात्र आताच्या शिंदे आणि फडणवीस सरकारने वारकऱ्यांसाठी व्यवस्था उभी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांसोबत ज्या काही घटना घडल्या तेव्हा आम्ही कोणतेही राजकारण केले नाही. उलट मदत कशी पोहचवता येईल यावरच भर दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आळंदी येथील घटनेवरून सरकारला घेरले आहे , असेही बावनकुळे म्हणाले.