खरगोन : मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.०९) सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली. या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फूट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक MP 10 P 7755 ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. यामध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. यामधील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. या दुर्घटनेती जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे
दरम्यान मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.