नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सीबीआय कमी पडल्याचे अनुपम म्हणाले.
६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना एकनाथ निमगडे यांची बंदूकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
न्यायमूर्ती भरत पी देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सीबीआयने न्यायालयाच्या निर्देशानुसार, हत्याकांडाच्या तपासाचा सर्वसमावेशक अहवाल सादर केला व सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याकरिता आवश्यक पुरावे आढळून आले नाही, अशी माहिती दिली. तसेच, सीबीआयने या प्रकरणाची फाईल बंद करण्याची परवानगी मागितली. यावर अनुपम निमगडे यांनी आक्षेप घेतला आहे.
पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हत्याकांडाचा पर्दाफाश केला होता. गुन्हेगारांची नावेही जाहीर केली होती. परिणामी, सीबीआयने योग्य पद्धतीने तपास केला नाही, हे दिसून येते. करिता, तपासाकरिता विशेष पथक स्थापन करावे , असे निमगडे म्हणाले.
दरम्यान न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर उन्हाळी सुट्ट्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.