– १, ५०,००० लाभार्थी बुस्टर डोजसाठी पात्र
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांनुसार नागपूर महानगरपालिका कार्य करीत आहेत. मनपाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, व्यापक लसीकरणावर भर दिल्या जात आहे. अशात ज्या लाभार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘कोव्हॅक्सिन’ चे दोन्ही डोज घेऊन सहा महिने झाले असेल, अशा पात्र लाभार्थ्यांनी बुस्टर डोज घ्यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे साथरोग नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.
कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग केल्या जात आहे.
तसेच महानगरपालिके मार्फत कोव्हिड लसीकरणावर भर देण्यात येत असून, सध्या महानगरपालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध आहे.सध्यस्थितीत कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोज लसीकरणाकरीता शहरातील १,५०,००० लाभार्थी पात्र आहेत. तरी या लाभार्थीनी महानगरपालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा व सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे अस आवाहन डॉ. नवखरे यांनी केले आहे. नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
दररोज लसीकरण सत्र
महानगरपालिकेच्या पाचपावली स्त्री रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, महाल रोग निदान केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालयात व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे दररोज लसीकरण सत्र होत आहेत. इतर आरोग्य केंद्रात लाभार्थीच्या उपलब्धतेनुसार सत्र आयोजित करण्यात येत आहेत.