ट्विटर, फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर: प्रत्यक्ष संवादाअभावी वाढली दरी?
नागपूर: राज्याच्या राजकारणात निर्माण झालेले वादळ सोशल मिडियाच्या माध्यमातून हातात मोबाईल असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचले. २१ जूनपासून कधी नव्हे एवढा ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर या वादळात सापडलेल्या नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे. यातून निर्माण झालेल्या राजकीय स्थितीवर नियंत्रणाऐवजी इर्ष्या, द्वेषाचा भडका उडत असल्याचे चित्र असून प्रत्यक्ष संवादाचा अभाव कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाचा वापर घराघरांत वाढला. त्यातून कुटुंबातही एकलकोंडेपणा वाढला. एकमेकांना गृहित धरण्यासारखे प्रकार वाढले. त्याचे परिणाम कुटुंबातील प्रत्येकच सदस्याला सोसावे लागत आहे. तीच स्थिती आज राज्याच्या राजकारणात दिसत असल्याचे मत सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.
गेली अनेक दशके एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून निष्ठेने काम करणारे आज सत्तेसाठी लढताना दिसत आहे. २१ जूननंतर या नेत्यांनी सोशल मिडियातूनच एकमेकांवर आरोप सुरू केले. बंडखोर एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा दिवसांत पंचवीस ट्विट केल्याचे दिसून येते. दोन दिवस मवाळ असलेले शिवसेनेचे नेतेही नंतर चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप, प्रत्तुत्तर देण्याची मालिकच सुरू झाली असून ती आजही कायम आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वतः गेल्या सहा दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत फारच कमी सहा ते सात ट्विट केले. परंतु त्यांनी शिवसेनेला अनुकूल अनेक ट्विट रिट्विट केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळेला सोशल मिडियाचा मोठा वापर राजकीय नेत्यांकडून केला जात होता.
परंतु गेल्या सहा दिवसांत सोशल मिडियातूनच पत्र जाहीर करणे, बंडखोर आमदारांकडून त्यांचे मत असलेले व्हीडीओ अपलोड करून आपल्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविल्या जात आहे. उत्साहाच्या भरात नको ते वक्तव्य पोस्ट केल्याने शिवसैनिकही संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन बोलण्याचे आवाहन बंडखोरांना केले होते. या काळात मुख्यमंत्र्यांनी मात्र सोशल मिडियावर संयम बाळगल्याचे दिसून येते. त्यांचे ट्विट बघितल्यास केवळ सरकारचे निर्णय, जयंती आदीचेच दिसून येत आहे. एकूण संवाद नसल्याने सोशल मिडियावर राजकीय चकमक दिसून येत असल्याचे पारसे यांनी सांगितले.
प्रत्यक्ष संवाद, चर्चेतूनच कुठल्याही समस्येवर तोडगा शक्य आहे. परंतु आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात आहोत, असे गृहित धरून प्रत्यक्ष संवाद टाळला जातो. त्यातूनच निर्माण झालेली दरी मग कुटुंब असो की राजकीय पक्ष उद्धवस्त होण्यास कारणीभूत ठरते. सोशल मिडियाचा निश्चितच मोठा लाभ होतो. ते संवादाचे माध्यमही आहे. परंतु प्रत्यक्ष संवाद अधिक परिणामकारक ठरतो.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com