युवा नागभूषण पुरस्कार वितरण
लहान मुलांच्या हातातून मोबाईल काढा
नागपूर: नागपुरात केवळ रस्त्यांचाच नव्हे तर क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासोबत सर्व क्षेत्रात विकास होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व या शहराचे चित्र बदलून जावे, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
युवा नागभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी नागभूषण फाऊंडेशनचे विलास काळे, अजय संचेती, निशांत गांधी, बैद्यनाथचे सुरेश शर्मा आदी उपस्थित होते. आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सानिया पिल्लई, मैत्रेयी घनोटे, देवाय मेहता व आल्फीया पठाण या चार जणांना पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी ना. गडकरी पुढे म्हणाले- नागपुरात अनेक प्रतिभावान तरुण-तरुणी आहेत. खेळाडूही आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत असे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नागपुरात विविध भागात खेळाची मैदाने तयार करण्यात येत आहेत.
या सर्व मैदानांवर सकाळ व सायंकाळी 1 लाख खेळाडू खेळावेत असा प्रयत्न आहे. आजकाल लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतात. यामुळे ते मैदानांवर खेळतच नाही. आधी या मुलांच्या हातातील मोबाईल पालकांनी काढावे. विविध प्रकारचे खेळ खेळल्यामुळे मुलांचे व्यक्तित्त्व घडते, असेही ते म्हणाले.
शहराची सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती झाली आहे. उच्च शिक्षणाच्या व्यवस्था शहरात करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक दृष्टीने शहराचा विकास करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु आहेत. नागपूरचा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा असे प्रयत्न सुरु आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नागपुरात विविध क्षेत्रात अनेक लोक मोठे झाले आहे. या मान्यवरांमुळे नागपूरचे नाव मोठे झाले आहे. हा जो इतिहास आहे, तो नवीन पिढीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ज्या चौघांचा आज सत्कार झाला, ते क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात करणारे नागपूरचे भूषण आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.