नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांग व्यक्तींकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत एकात्म मानवतावादाचे प्रणेते पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी (ता. ११) नागपूर क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता वैयक्तिक तथा सामूहिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत २५ दिव्यांग लाभार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते प्रत्येकी ९५ हजारांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सोबतच महापौरांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र ९ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजाराचे धनादेश वितरित केले. असे एकूण ३४ दिव्यांग लाभार्थ्यांना महापौरांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त रवींद्र भेलावे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, नूतन मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध कल्याणकारी कार्याला गती मिळावी यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये ७.५० कोटी रूपये निधीचे प्रावधान करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिव्यांग व्यक्तीने सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली उन्नती करावी या उद्देशाने मनपातर्फे २०० दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अनुदानाचा उपयोग प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी करून चांगली सुरुवात करा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
पुढे ते म्हणाले, नागपूर महानगरपालिका देशातील एकमेव महापालिका आहे जी पंतप्रधान आवास योजनेतील पात्र दिव्यांगांना घर बांधण्यासाठी मदत म्हणून ५० हजार रुपये देत आहे. मागील एक वर्षात दिव्यंगांसाठी अनेक योजना राबविण्यात आलेल्या असून प्रत्येक दिव्यांगांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. दिव्यांगांना देण्यात आलेल्या ट्रायसिकलची दुरुस्ती शहरातच व्हावी या दृष्टीने मनपा कार्य करीत आहे. यासोबतच अंध विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक साधनसामुग्री सुद्धा मनपातर्फे पुरविण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी महापौरांनी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्तापक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेवक दिनेश यादव यांनी आपले विचार मांडले व दिव्यांगांना शुभेच्छा दिल्या आणि महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार व्यक्त केले.
दिव्यांगांना योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध : दिव्या धुरडे
नागपूर महानगरपालिका दिव्यांगांना विविध विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे. महिला व बालकल्याण समितीमार्फेत दिव्यांगांना ईरिक्षा, मोटराईज ट्रायसिकल देण्यात आलेल्या आहेत. आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यांचे विचार अनुसरून शेवटच्या व्यक्तीला योजनेचा लाभ आणि मदत पोहचविण्याचे कार्य मनपातर्फे केल्या जात आहेत, असे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या धुरडे म्हणाल्या.