मनपा, युवा दौड मंच, समनेट इंडिया यांचा संयुक्त उपक्रम : प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला जनजागृती
नागपूर : नागपूर शहरातील फुटपाथ, रस्त्यांवरून नागरिकांना मोकळेपणाने चालता यावे, प्रत्येकाने पायी चालावे, प्रत्येकाला तसा अधिकार आहे. या जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘पायी चालण्याचा अधिकार’ या अभियानाचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (ता.११) मेडिकल चौक येथून शुभारंभ केला. यावेळी महापौरांनी मेडिकल चौक ते अशोक स्तंभ चौकापर्यंत चालून जनजागृती केली.
याप्रसंगी युवा दौड मंचचे अध्यक्ष तथा नॅशनल रोड सेफ्टी कौन्सिल, परिवहन मंत्रालय भारत सरकारचे अशासकीय सदस्य राजू वाघ, रोडमार्क समनेट इंडियाचे सदस्य सचिन पुराणिक, फेसकॉम विदर्भ अध्यक्ष बबनराव वानखेडे, श्री कुंभलकर, विदर्भ जेष्ठ नागरिक महामंडळचे सचिव अविनाश तेलंग, रोटरी क्लब, चेतना बहुद्देशीय संस्थेचे अविनाश इलमे, सोहम बहुद्देशीय संस्थेच्या श्रुती देशपांडे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदा नायडू, जिजाऊ संस्थेच्या शारदा मनोहर गावंडे, आनंद कजगिकर, अथर्व काठोते, गणेश तायडे, अखिल पवार आदींसह एकूण १२ सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मनपाचे वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे यावेळी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी ११ जानेवारी रोजी आरटीओ मध्ये आयोजित पादचारी दिन कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला पायी चालण्याचा अधिकाराबाबत जनजागृती करण्याचे संकल्पना मांडली होती. त्याअंतर्गत शुक्रवारी (ता. ११) महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रत्येकाला पायी चालण्याचा अधिकार मिळावा याबाबत जनजागृती करीत या अभियानाचा शुभारंभ केला.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, ११ जानेवारी संपूर्ण भारतात पादचारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पायी चालण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. वर्षातून एक दिवस पायी चालण्यासाठी साजरा करण्यापेक्षा दर महिन्याला याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. या संकल्पनेतून पायी चालण्यासाठी चालण्यायोग्य फुटपाथ, रास्ता असावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अभियानात १२ सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. तसेच हा उपक्रम पुढेही असाच सुरु राहील अशी, आशा यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी राजू वाघ यांनी संपूर्ण अभियानाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे समारोप विदर्भ जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव अविनाश तेलंग यांनी केले.