महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांचा महापौर पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ ७ जानेवारीला यशस्वीरित्या पूर्ण झाला. या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रासह अनेक लोकोपयोगी महत्वपूर्ण निर्णय घेत लक्षणीय कामगिरी केली. यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे रविवारी (ता. ९) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर तथा नगरसेवक संदीप जोशी, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, माजी सत्तापक्ष नेते तथा नगरसेवक संदीप जाधव, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विजय (पिंटू) झलके, प्रदीप पोहाणे, बाल्या बोरकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते.
शिक्षण
* शिक्षण विभागाने आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने ६ विधानसभा मतदारसंघात इंग्रजी माध्यमाच्या केजी-१ आणि केजी-२ चे वर्ग सुरू केल. या सर्व शाळांना पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व वर्गातील प्रवेश पूर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत.
* महानगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे १९२८ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १८२५ टॅबलेटचे वाटप करण्यात आले असून उर्वरित टॅबलेट मनपा शळेतील दिव्यांग व सुपर-७५ च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
* मनपाद्वारे विद्यार्र्थ्यांना खेळातून विज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी गरबा मैदानावरील बंद असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत पद्मभूषण डॉ. भाटकर विज्ञान संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे संचालन असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायंस एज्यूकेशनच्या सहकार्यांने करण्यात येणार आहे.
* दहावी, बारावी आणि पदवीचे शक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महापौर कार्यालयात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा लाभ आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
* मनपा शाळांतील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेउन त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि एन.डी.ए. च्या परिक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन करण्यासाठी सुपर-७५ योजना सुरू करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्ग सुरू झाले आहेत. ऑफलाइन वर्ग नेताजी विद्यालय, फूल मार्केट, बर्डी येथे सुरू करण्यात आले आहेत. असोसिएशन ऑफ प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे अध्याक्ष डॉ. राजनिकांत बोंद्रे, सचिव गणवीर यांचे सहकार्य मिळत आहे. मुलांना देण्यात येत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल मुलांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
* खेळातून विज्ञानाची माहिती मिळण्याच्या उद्देशाने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रभाषेच्या सहकार्याने आयोजित या मेळाव्या आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. महाराष्ट्र शासनही याप्रकारच्या प्रकल्पाला संपूर्ण राज्यभरात सुरू करणार आहे.
* ‘मासुम’ या संस्थेच्या माध्यमातून दहावीतील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
* गणित दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी चिटणीस पार्क येथे ‘बे एके बे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
* मुंबईच्या लॉयन्स क्लबच्या सहकार्याने मनपा शाळांतील १६ हजार विद्यार्थ्यांना बीवायजेयू (BYJU) या ऑनलाईन शिक्षण ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
* मनपाच्या सुरेंद्रगढ शाळेतील दोन विद्यार्थ्यांची छोटे उपग्रह बनविण्याच्या राष्ट्रीय उपक्रमात निवड झाली. या विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी रु. ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
* झिंगाबाई टाकळी येथील बंद पडलल्या शाळेला नव्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीचे नूतनीकरण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
* महापौर प्रगल्भ विद्यार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक झोनमध्ये एक अभ्यासिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी परिक्षेची तयारी करण्याची संधी मिळेल.
* मध्य नागपुरातील बजेरिया क्षेत्रात भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी ई-लायब्ररी तयार करण्यात येत आहे. १२ हजार वर्ग फूट क्षेत्रफळात तयार होत असलेली ही चार मजली इमारत सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त राहील. लवकरच या इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल. या ई-लायब्ररीत हायस्पीड इंटरनेटची व्यवस्था राहील. अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी संगणकाची व्यवस्था त्यात असेल. बोलणारे संगणकही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ई-लायब्ररीचे संचालन आय.आय.टी. खडगपूर च्या माध्यमातून करणे प्रस्तावित आहे.
* शहरातील पुतळ्यांची देखभाल करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुतळ्यांची देखरेख सुरू झाली आहे. यू.जी.सी.ने असा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यावरण
* पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या हेतूने यावर्षी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. पीओपी मूर्तींवर कठोर प्रतिबंध लावण्यात आले.
* शहरातील जलस्त्रोतांना स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पोलिस लाईन टाकळी, गांधीसागर तलाव आणि सोनेगाव तलावांचे पुनर्जीवन व सौंदर्यीकरण करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. तीनही ठिकाणांना पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे, गांधीसागर तलावात एसटीपी तयार करण्यात येणार असून लगतच्या वस्त्यांमधून येणाऱ्या पाण्याला शुद्ध करून तलावात सोडले जाईल. सोनेगाव तलावात सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट लावण्यात आला असून शुद्ध पाणी तलावात सोडले जात आहे.
* राज्य शासनाकडून निधी प्राप्त होताच सक्करदरा तलवाच्या पुनर्जीवन आणि सौंदर्यीकरणाचे कार्य सुरू करण्यात येईल.
* पोलिस लाईन टाकळीचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून केले जात आहे.
* नागपूर शहरातील प्रमुख नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदीच्या पुनरुर्जीवन कार्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाची आर्थिक मान्यता प्राप्त झाली आहे. लवकरच प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ होईल. पी.एम.सी.ची नियुक्ती झालेली आहे.
* या प्रकल्पांतर्गत शहरातील उत्तर आणि मध्य विभागातील मलवाहिनींचा विस्तार प्रस्तावित आहे. जुन्या जीर्ण झालेल्या मलवाहिनी हटवून नवी ट्रंक लीन टाकली जाईल. पिली आणि पोहरा नदीचाही या योजनेत समावेश आहे.
* मनपा उद्यानांमध्ये छोटे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावून नदी व नाल्यांमधून वाहणाऱ्या घाण पाण्याला शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्याचे कार्य सुरू झाले आहे. सर्व प्रकल्प सौर ऊर्जा संचालित आहेत. यात स्वच्छ होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आर. ओ. मधील पाण्यासारखी आहे. शंकर उद्यानात लावण्यात आलेल्या एसटीपीतील पाण्याचा उपयोग बांधकाम कार्यासाठी केला जात आहे.
* शहराला सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने ७५ ऑक्सीजन पार्क निर्मितीचे कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत ३९ ऑक्सीजन पार्क तयार झाले आहेत. उर्वरीत पार्क १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कडुनिंब, वड, पिपळ आदी झाडांचा समावेश आहे.
* पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेअंतर्गत मनपा वाहतूक विभागातील १०० डिझेल बस सीएनजी मध्ये परावर्तीत करण्यात आल्या आहेत. यासोबतच ४० इलेक्ट्रिक बस नव्याने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून १५ ए.सी. इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे.
* महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी मनपाला १९९ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून १६० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे.
* शहरातील वातावरण ठीक करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाच्या निधीतून आणि निरीच्या सहकार्याने पर्यावरणपूरक दहनघाट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अशाप्रकारचा देशातील दुसरा दहनघाट असेल.
* हवेतील धूळकण कमी करण्याच्या उद्देशाने निरीच्या माध्यमातून मोबाईल वॉटर शॉवरिंग टॉवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे टॉवर धूळ कणांना शोषून घेते.
* ध्वनी प्रदूषणवर नियंत्रण मिळविण्यासाठी निरीचे डॉ. लाल सिंह यांच्या नेतृत्वात रस्त्याच्या मधोमध अशी झाडे लावण्यात येत आहेत ज्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
* मनपा गोळा करीत असलेल्या कचऱ्यापासून सीएनजी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चेन्नई महानगरपालिकामध्ये कार्यरत एक संस्थेने अशाप्रकारचा प्रकल्प नागपुरात सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली. कचऱ्याला स्वयंचलित मशीनच्या माध्यमातून ओला आणि सुखा असे विलग करण्यात येईल. या दोन्ही कचऱ्यातून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती होईल. प्रायोगिक तत्त्वावर ५० टनांचा प्रकल्प लावण्यात येईल. यासाठी महासभेची मंजुरी घेण्यात येईल. यासाठी मनपावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.
* केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून डच कंपनीने एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पासाठी कंपनी स्वत: जमिनीची खरेदी करेल. सीएनजीमधून प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये मनपाचा वाटा असेल. निरीने यास मंजुरी दिली आहे. सदर विषय मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवण्यात येईल.
* ई-कचऱ्याचञया वाढत्या समस्येवरही उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू
* एलईडी पथदिवे योजनेअंतर्गत नागपूर शहरातील सर्व जुने पथदिवे बदलण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे वीज बिलात मोठी कपात झाली आहे.
* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहरात ‘वंदेमातरम् उद्यान’ बनविण्यात येत आहे. परमवीर चक्र प्राप्त २१ शूर सैनिकांना समर्पित या उद्यानात त्यांचे तीन फूट उंच म्यूरल तयार करण्यात येणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीची माहिती देण्यात येईल. केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयातर्फे वॉर ट्रॉफीच्या रूपात टी-७ट टँक, एक हॉवित्जर तोफ आणि एक मि विमान यासाठी प्राप्त होणार आहे.
* मारवाडी चाळीपासून राजवाडा पॅलेसपर्यंत रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. झिरो माईल फ्रीडम पार्कपासून रातुम नागपूर विद्यापीठापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे बांधकामही पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्र
* कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी बेड्सची संख्या वाढविणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे, कोरोना चाचणीला गती प्रदान करणे आणि केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानाला गती प्रदान करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. नागपूर शहराने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दुसऱ्या मात्रेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अभियानाला गती देण्यात येत आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवांचे लसीकरण सुरू झाले असून त्यालाही उत्तम प्रतिसाद आहे.
* कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याच्या दृष्टीने मनपातर्फे व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी, राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मागील लाटेत ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली होती. तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने रातुम नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये १९९ बेड्सचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे.
* दुसऱ्या लाटेत कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रतिदिन २० हजार चाचणी करण्यात येत होत्या. या लाटेतही चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
* राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेच्या माध्यमातून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी ९१ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सुमारे २७ हजार नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. कॅन्सर तपासणीचेही नियोजन करण्यात आले होते. किडनी, लिवर आणि लिपीड प्रोफाईलच नि:शुल्क तपासणी करण्यात आली. मनपाच्या हत्तीरोग विभागानेही नागरिकांची तपासणी करून नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिली.
* महापौर नेत्र ज्योती अभियान : महापौर नेत्र ज्योती अभियानांतर्गत डॉ. महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने शहरातील ३२ ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून ४१२० नागरिकांनी डोळ्यांची तपासणी केली. सुमारे दोन हजार व्यक्ती मोतीबिंदू रुग्ण आढळले. त्यामधील ३७३ नागरिकांवर केंद्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली.
* महापौर दंत चिकित्सा शिबीर : महापौर दंत चिकित्सा शिबिराचे ३२ ठिकाणी आयोजन करण्यात आले. ३३१० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबीरस्थळी दातांची स्वच्छता, फिलींग, आणि दात काढण्याचे कार्य करण्यात आले. रूट कॅनल उपचारासाठी शासकीय दंत महाविद्यालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली जेथे शासकीय दरात उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
* यावर्षी प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या २७ वरून वाढवून ५१ करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. १४ केंद्राच्या कार्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. शहरी सामुदायिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मिनीमात नगर व नारी येथे ३० बेडस्चे रुग्णालय तयार करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. केंद्र शासनाने यासाठी १० कोटींचे प्रावधान केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
* आयुष योजनेच्या माध्यमातनून दाभा मनपा शाळेलगतच्या जमिनीवर ५० बेड्सचे रुग्णालय प्रस्तावित आहे. या सत्रात त्याचे बांधकाम सुरू होईल, असा प्रयत्न आहे.
* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहरात ७५ वंदे मातरम् आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे. ज्याअंतर्गत धन्वंतरी जयंतीला भीवसेन खोरी आणि पांढराबोडी परिसरातील दोन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत २५ केंद्र लोकसेवेत दाखल होतील. मार्चपर्यंत सर्व केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आचारसंहितेमुळे कार्य संथगतीने झाले.
* नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पांचपावली स्त्री रुग्णालयात गर्भाशयाच्या कर्करोगाची नि:शुल्क तपासणी प्रारंभ करण्यात आली. येथे तपासणी मशीन लावण्यात आली आहे.
* पाचपावली स्त्री रुग्णालयात सिकलसेल रिसर्च यूनीटची स्थापना करण्यात आली. केंद्र शासन, नगपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्र पेढीच्या सहकार्याने त्याचे संचालन करण्यात येत आहे. या केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ…….. जैन आहेत.
* मनपाच्या माध्यमातून ‘ह्युमन मिल्क बँक’ प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाने डागा रुग्णालयात त्याची स्थापना केली आहे. एका शहरात दोन केंद्रांची आवश्यकता नसल्याने या योजनेला स्थगीत करण्यात आले.
* महापौर कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी एका केंद्राची स्थापना करण्यात आली. प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी हे केंद्र सुरू असते.
* कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. १९७१ मधील युद्धात सहभागी सैनिकांचाही सत्कार करण्यात आला.
* ३०० स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या घरासमोर त्यांच्या नावाचा फलक लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
* दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत २१ प्रकारच्या दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे, त्यांचे शैक्षणिक उत्थान करणे आणि त्यांना सामाजिक आधार देण्याचा निर्णय करण्यात आला. याअंतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होण्यासाठी, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.