Published On : Fri, Dec 24th, 2021
By Nagpur Today Nagpur News

अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

Advertisement

नागपूर: कृषी क्षेत्र हे सर्वाधिक व्यापक क्षेत्र आहे. देशात अनेक क्षेत्रात खाजगी व अन्य गुंतवणूक केली जाते. पण कृषी क्षेत्रात मात्र खाजगी गुंतवणूक केली जात नाही. या क्षेत्रातही खाजगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे, त्यामुळे कृषी क्षेत्राची पर्यायाने शेतकर्‍याची प्रगती साधणे शक्य होईल, असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्यक्त केले.

अ‍ॅग्रो व्हीजन 2021 या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन आज तोमर यांच्या हस्ते भट सभागृहात झाले. प्रत्यक्षात प्रदर्शन रेशीमबाग मैदानावर सुरु झाले आहे. या कार्यक्रमाला अ‍ॅगो व्हिजन प्रदर्शनचे प्रवर्तक केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण, महापौर दयाशंकर तिवारी, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिल बोंडे, माजी आ. पाशा पटेल, डॉ. पातुरकर, सचिव संजय अग्रवाल, अरुण नारायण, प्रदर्शनाचे सचिव रवी बोरटकर, डॉ. मायी, संचालक रमेश मानकर आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एका स्मरणिकेचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगताना ना. नरेंद्रसिंग तोमर म्हणाले- कृषी क्षेत्रात बरेच असंतुलन होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने या क्षेत्रातील असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्‍यांसाठी विविध योजना आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात करून शेतकर्‍यांचे जीवन अधिक सुकर बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकर्‍यांना देण्यात येणारी माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून केले जाते. यामुळे शेतकर्‍यांना यशस्वी मार्गदर्शन लाभत आहे. याचा फायदा देशातील शेतकर्‍यांना होतो आहे.

यंदा केंद्र शासनाच्या प्रयत्नांमुळे तेलबियांच्या लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे सांगताना ना. तोमर म्हणाले- खाद्य तेलाच्या आयातीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने करण्यात आलेला हा प्रयत्न यशस्वी होत आहे. 28 लाख हेक्टर क्षेत्रात पाम तेल तयार होणार्‍या पिकाची लागवड तर उत्तर पूर्व भारतात 9 लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. देशातील सर्वात अधिक व्यापक असलेल्या या क्षेत्रात खाजगी गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तूर्तास शासकीय योजनांच्या माध्यमातून या क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. कृषी क्षेत्र हा देशाचा पाठीचा कणा आहे. हा कणा मजबूत असला तर देश मजबूत होईल. जेव्हा जेव्हा कोणते संकट देशावर आले, तेव्हा तेव्हा या क्षेत्रानेच महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही ना. तोमर म्हणाले.

पंतप्रधान किसान योजनेत 1.62 लाख कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगून ना. तोमर म्हणाले- शासनाने शेतकर्‍यांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. शासनाच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजना शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. आज तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाशी शेतकरी जोडला गेला आहे. त्यामुळे अनेक वस्तू शेतकरीही निर्यात करू लागला आहे, याकडेही त्यांनी आपले लक्ष वेधले.

ना. नितीन गडकरी

नवनवीन संशोधन, माहिती व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले तर देशातील शेतकरी सुखी, संपन्न व शक्तिशाली होईल. हेच काम अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून केले जात असे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, 13 वर्षाचा या प्रदर्शनीचा इतिहास आहे. ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पूर्णत्वाकडे जात आहेत. 3 लाख शेतकर्‍यांना 40 कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून ज्या शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाते, त्याचा फायदा शेतकर्‍यांना होतो आहे. शेतकरी हा लाखोपती व्हावा हे आपले स्वप्न आहे, ते पूर्णत्वाकडे जात आहे. ज्ञान, विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाशी शेतकरी जोडला जात आहे. ज्ञान ही शक्ती आहे. याचा उपयोग करून शेतकरी आता अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा दाताही झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. ऊसापासून इथेनॉल, तणस, कचरा, यापासून सीएनजी शेतकर्‍याने बनवला आहे. इथेनॉलवर सर्व वाहने चालत आहे. इथेनॉलचे पंपही सुरु होत आहे. वाहनांना इथेनॉल व पेट्रोलवर चालणारे फ्लेक्स इंजिन लावले जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा प्रश्न संपणार आहे. आज 4 हजार कोटी लिटर इथेनॉलची देशाला गरज आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.


शेतकर्‍यांनी आता ड्रोनच्या साह्याने पिकावर फवारणी करावी असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ड्रोनला आता लिथियम ऑयन बॅटरीची गरज नाही. फ्लेक्स इंजिन लावून इथेनॉलवरही ड्रोन चालवता येते. तसेच नॅनो युरियाचा उपयोग शेतकर्‍यांनी करावा. बांबूपासून इंधन निर्मितीसाठी शेतकर्‍यांनी बांबूची लागवड करावी. खडकाळ जमिनीवर बांबू लागवड शक्य आहे. बांबूपासून इथेनॉल निर्मिती झाली आहे. ट्रॅक्टर आता सीएनजीवर चालविणे यशस्वी झाले आहे. यामुळे शेतकर्‍याला वर्षाकाठी इंधनात 1 ते सव्वा लाख रुपये बचत होणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी ना. गडकरी यांनी सिंदी ड्रायपोर्ट, किसान रेल्वे गाडी, शेतकर्‍याकडून उत्पादित वस्तूंची निर्यात, कृषी ग्रामीण व आदिवासी भागाचा विकास, फार्मर प्रोड्युस कंपन्यांची निर्मिती अशा विविध मुद्यांना स्पर्श करीत सविस्तर विवेचन आपल्या भाषणातून केले. कार्यक्रमाचे आभार अ‍ॅगो व्हिजनचे संचालक रमेश मानकर यांनी मानले.

ना. तोमर यांच्याकडून ना. गडकरींचे कौतुक

बहुआयामी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व अशा शब्दात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ना. नितीन गडकरी यांचे कौतुक केले. ना. गडकरींसारखे नेतृत्व या भागाला लाभले हे विदर्भाचे भाग्य आहे. ना. गडकरी यांनी नवनवीन प्रयोगांमधून व तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी क्षेत्राची व शेतकर्‍यांची प्रगती साधण्याचे प्रयत्न केले आहे. या माध्यमातून उपासमार, बेरोजगारी व गरिबी हटविण्याचे प्रयत्न ना.गडकरी यांनी केले आहे. अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन आणि संशोधन व तंत्रज्ञानाची मदत होत असल्याचेही ना. तोमर यांनी म्हटले.

Advertisement
Advertisement