‘सियाम’चे वार्षिक अधिवेशन
नागपूर: देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राची भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आणि मजबुतीसाठी प्रमुख भूमिका असून या क्षेत्राने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. 7.5 लाख कोटींची उलाढाल करणारे हे क्षेत्र असून निर्यातीतही हे क्षेत्र अग्रेसर असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘सियाम’च्या वार्षिक अधिवेशनात ते ‘टेक्नॉलाजिकल अॅडव्हान्समेंट इन द वर्ल्ड’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योगांचे सशक्तीकरण करून त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला करण्याच्या दृष्टीने महामार्ग मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहे. या क्षेत्राने 37 अब्ज रोजगार निर्मिती केली असून यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 12 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
आगामी काळात भारत हा क्रमांक एकचा ऑटोमोबाईल हब बनेल अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- कोविडमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असताना या क्षेत्राची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. तसेच वाहतूक व्यवस्था आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाच्या या प्रयत्नांना ऑटोमोबाईल क्षेत्राचे चांगले सहकार्य मिळत आहे. नवीन तंत्राचा वापर करून पायाभूत सुविधा निर्माण करीत असताना पर्यावरण रक्षणाचे लक्ष ठेवत व डिझेल पेट्रोल या इंधनाला पर्यायी इंधन उपलब्ध करून देण्याच्या आपला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोल डिझेल या इंधनाचा पर्यायी इंधन म्हणून जैविक इंधनाचा वापर वाढावा. कारण ते किंमतीला परवडणारे आणि स्वदेशी आहे, या शासनाच्या भूमिकेला ऑटोमोबाईल क्षेत्राचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून वाहनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्याचे सुचविले. ऑटोमोबाईल कंपन्यांने याकडे अधिक द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशातील तांत्रिक महाविद्यालयांचा फायदा घेत उत्तम तंत्रज्ञानाचा विकास व्हावा. तसेच कृषी क्षेत्राला जैविक इंधन निर्मितीकडे वळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
फ्लेक्स इंजिनच्या वापरावर अधिक भर देताना ना. गडकरी म्हणाले- 100 टक्के इथेनॉल किंवा पेट्रोलवर चालणारे या इंजिनचे प्रयोग ब्राझीलमध्ये यशस्वी झाले आहे. ब्राझीलचे हे तंत्रज्ञान आपण स्वीकारण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आणि मजबुतीसाठी हे आवश्यक आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगसाठी सौर ऊर्जेच्या वापराला शासन प्रोत्साहन देत आहे. नुकताच आपण ट्रॅक्टर बायो डिझेलवर चालविला असून लवकरच इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टरही आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्क्रॅपिंग पॉलिसीही आमच्या विभागाने आणली असून त्याचाही फायदा होणार आहे. पर्यावरण रक्षणाच्या आणि अपघात नियंत्रणाच्या दृष्टीने हे धोरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.