Published On : Mon, Feb 22nd, 2021

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Advertisement

जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा

* लॉकडाऊन नाही पण नियमांची कडक अंमलबजावणी
* मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन प्रभावी उपाययोजना
* हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा
* नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

Gold Rate
20 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,200/-
Gold 22 KT ₹ 1,22,900 /-
Silver/Kg ₹ 2,03,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या “मी जबाबदार” या मोहिमेसोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. राजेश गोसावी, डॉ. महमद फजल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचे सद्य:स्थिती व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना त्यासोबतच रुग्णसंख्या वाढीचा दर व मृत्यूदर याबाबत आढावा घेताना डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भातील तपासण्यांची संख्या वाढवितानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लग्नसमारंभामुळे गर्दी वाढत असून यावर नियंत्रण ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. ज्या भागात हॉटस्पॉट निर्माण झाले आहे, त्या हॉटस्पॉटनिहाय संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा असे सांगून डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क,सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोनासंदर्भातील तपासणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घेवूनच तपासणी करावी. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती तपासणी केंद्राकडे असावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अपूर्ण माहिती असल्यामुळे शोध घेणे शक्य होत नाही व कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात तपासण्या वाढविण्यात आल्या असून गर्दीवर नियंत्रण टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवून नियंत्रण करणे आवश्यक आहे. शहरात नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. यामध्ये जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर येथे येथे हॉटस्पॉट तयार झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे संपूर्ण इमारत, वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनमध्ये रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांनी गर्दी टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध अधिक प्रतिबंधात्मक कारवाईची आवश्यकता आहे. मंगलकार्यालय, लॉन, सभागृह, हॉटेल, उपहारगृह यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस व महानगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात तसेच शहरात आजपासून लागू करण्यात येत असलेले निर्णय पुढीलप्रमाणे जाहीर केले आहे.

·मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.

·कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.

·जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, पेट्रोल पंप, औषध वगळून) बंद ठेवणार.

·आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.

·जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.

·लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील.

·कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.

·कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आयएलटी तसेच सारीची तपासणी करणार.

·शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.

· मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.

· नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

· जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .

· ऑनलाईन सर्व सेवा (खाद्य पुरवठा) सुरु राहतील.

· शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.

· त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.

· कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement