नागपूर. पदवीधर मतदार संघाचा नागपूर विभाग हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी तो कायम राखत आणला आहे. ही जबाबदारी आता पक्षाने आपल्या खांद्यावर दिल्याने पदवीधर, शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा गड पुढेही कायम राखण्यासाठी प्रयत्नरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नागपूर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी दिली.
ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नागपूर शहराचा महापौर असा दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनात प्रवास करीत आलोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच दिग्गजांनी आज या प्रवासात पदवीधरांचे नेतृत्व करण्याची, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संधी म्हणून पक्षाने उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी सांभाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. त्यात पुन्हा एकदा पक्षाने नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीची जबाबदारी टाकल्याचे समाधान आहे.
मागील २० वर्षांपासून नागपूरच्या राजकारणाने माझी पारख केली आहे. दीन-दलित, शोषित-पीडित, रुग्ण या सर्वांपासून तर माझ्याकडे येणा-या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केला आहे. तो काळातही शंभर टक्के असाच सुरू राहणार आहे.
भाजपाचा कार्यकर्ता हा देवदुर्लभ कार्यकर्ता आहे. या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्याला सोबत घेउन सदैव काम करेने. यासोबतच पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बानकुळे, प्रा. अनिल सोले यांच्यासह सर्वच मान्यवर नेत्यांना सोबत घेउन या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा गड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. पदवीधरांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास पदवीधरांच्या सर्व समस्या, शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठीही प्रयत्न करेन, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.