Published On : Wed, Sep 2nd, 2020

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाही

– परिवहन विभागाचे निर्देश जारी

नागपूर: खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी केले आहे.

Gold Rate
13 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100/-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,80,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

बसचे प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांना वापरण्यासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची ‘थर्मल गन’द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोविड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. कंत्राटी बस (सिटींग) वाहनांमध्ये प्रवासी ‘एका आड एक’ पद्धतीने आसनस्थ होतील, अशाप्रकारे प्रवासी वाहतूक व्यवस्था असल्यास परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थ वर एक प्रवासी याप्रमाणे वाहतुकीस परवानगी असेल.

चालकाने प्रवासा दरम्यान जेवण/अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत, याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारिरीक अंतर (Social distancing) पाळतील, याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याचा व बस स्वच्छ राखण्याच्या सूचना द्याव्यात. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.

उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, 1988, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून उपरोक्त सूचना तसेच कार्यपद्धतीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल, अशा सूचना प्रादेशिक परिवहन विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement