Published On : Tue, Dec 31st, 2019

अनिल देशमुख होणार महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री?

Advertisement

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला असून आता खातेवाटपाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. त्यातही गृहमंत्रिपदाची सर्वाधिक चर्चा असून हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याच्या पदरी पडणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, येथेही धक्कातंत्राचा वापर करत शरद पवार हे महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील असलेले मंत्रिपद नागपूरमधील काटोल मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले अत्यंत विश्वासू व स्वच्छ प्रतिमेचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे सोपवतील, अशी खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. ते उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रिपद कुणाकडे जाणार, याचीच चर्चा सर्वाधिक असून या खात्यासाठी शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे व तसे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

६९ वर्षीय अनिल देशमुख हे पहिल्यांदा १९९५ मध्ये आमदार झाले. त्याआधी नागपूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते. देशमुख यांच्या गाठीशी संसदीय राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. युती सरकारच्या काळातही त्यांनी सांस्कृतिक मंत्रिपद यशस्वीपणे सांभाळलेले आहे. नंतर १९९९ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वात अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विविध खात्यांची धुरा समर्थपणे वाहिली. १९९९ ते २००१ या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्रिपद, २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर २००९ मध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला. त्यांच्या गाठीशी असलेला हा दीर्घ अनुभव लक्षात घेऊनच शरद पवार यांनी गृहमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागलेले अजित पवार यांनी गृहमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. यासोबतच छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांची नावेही या पदासाठी चर्चेत होती.

मात्र, शरद पवारांनी येथेही धक्कातंत्र वापरत विदर्भातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले अनिल देशमुख यांच्यावर या जबाबदारीसाठी विश्वास टाकण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा तसेच शेतकरी, शेतमजूर, बहुजन आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता, अशी देशमुख यांची ओळख आहे. त्यामुळेच पवार यांची गृहमंत्रिपदासाठी अनिल देशमुख यांना पहिली पसंती असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement