Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Oct 2nd, 2020

  हाथरस घटनेवर राज संतप्त; महाराष्ट्राच्या नावानं ओरडणारे आता गप्प का?

  मुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलिसांच्या कारभारावर खरमरीत सवाल करतानाच माध्यमांचाही राज यांनी समाचार घेतला आहे.

  राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. राज यांनी मोजक्याच पण नेमक्या शब्दांत या घटनेवर आपले म्हणणे मांडले आहे.

  ‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे, पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे’, अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?, असा सवालच राज यांनी विचारला.

  काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज जाणार होते. मात्र त्यांना त्याआधीच रोखण्यात आलं. पोलिसांनी राहुल यांना धक्काबुक्की केली त्यात ते खाली पडले. राहुल व प्रियांका गांधी यांना अटकही करण्यात आली. या प्रकारावरही राज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘पीडित मुलीच्या घरच्यांना कुणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?’, अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली.

  ओरडणारे आज गप्प का आहेत?

  अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद बराच गाजला होता. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची त्याला पार्श्वभूमी होती. त्यात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं. त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आघाडीवर होते. त्याचा थेट उल्लेख टाळत राज ठाकरे यांनी माध्यमांचा समाचार घेतला. ‘महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीये?’, असा बोचरा सवालही राज यांनी केला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145