| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 10th, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Nagpur News

  सूरमणी पं.प्रभाकर धाकडे यांचा गुरूवारी अभिनंदन सोहळा

  नागपूर:
  संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करून सातासमुद्रापलिकडे देशाचे नाव गौरवान्वित करणारे सुरमणी पं.प्रभाकर धाकडे गुरूजी यांचा शिष्य परिवारातर्फे गुरूवारी,११ जूनला अभिनंदन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. देशपांडे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा होईल. या सोहळयानंतर अनेक वर्षानंतर त्यांचे स्वत:चे सुमारे तासभर वायोलीन वादनाचा कार्यक्रमही होणार आहे. हा संपूर्ण सोहळा सर्वांसाठी निशुल्क असून, यानिमीत्ताने संगीतप्रेमींना त्यांचे वायोलीन वादन ऐकण्यासाठी एक चांगली मेजवानी आहे.
  पं.धाकडे गुरूजी यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘समताभूषण गौरव पुरस्कार’ देण्यात आला. तसेच, ऑल इंडिया रेडिओ, प्रसारभारती, भारत सरकारतर्फे वायोलीन वादनातील सर्वोच अशी ‘ए टॉप’ श्रेणी मिळाली. या दोन्ही सन्मानाबद्दल त्यांच्या शिष्य परिवाराने या गौरव सोहळयाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब उत्तरवार असतील.मुख्य अतिथी म्हणून कवी कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलींद माने तसेच आकाशवाणी नागपूर केंद्राचे केंद्र संचालक गोविंद राजन प्रामुख्याने उपस्थित राहतील.

  photo
  राज्य सरकारने यावर्षीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समताभूषण गौरव पुरस्कार सुरू केला. पहिल्याच वर्षी पुरस्काराचे मानकरी म्हणून त्यांची राज्य सरकारतर्फे निवड करण्यात आली. यासोबतच देशातील मोजक्या संगीततज्ज्ञांना आकाशवाणीतर्फे ‘ए टॉप’ ही श्रेणी दिल्या जाते.देशातील अगदी मोजक्या कलावंतांच्या यादीत पं. धाकडे यांचा समावेश झाला आहे. देशात अशी श्रेणी प्राप्त करणारे फारच कमी संगीततज्ज्ञ आहेत. ते स्वत: अनेक वर्षे आकाशवाणीत ज्येष्ठ वायोलीन वादक म्हणून कार्यरत होते. देशात व विदेशात त्यांचे अनेक शिष्य आहेत. अनेक शिष्यांनी उत्तुंग भरारी घेत त्यांचा नावलौकीक वाढविला आहे. आजही ते त्याच उत्साहाने संगीताचे धडे देत आहेत. त्यांच्या भास्कर संगीत विद्यालयातून नवे गायक तयार होत आहेत. खुद्द त्यांचे वायोलीन वादनाचेही अनेक कार्यक्रम अनेक देशात होत असतात. भावगीत, गझल,लोक​गीत,बुध्द भीम गीत आदी इतरही स्वरूपातील गीतांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. त्यांनी संगीतबध्द केलेल्या बुध्द भीम गीतांना सबंध देशभर अनेक नवे गायक ऐकवित असतात. या प्रकारातील गीतामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या या अभिनंदन सोहळयाला संगीतप्रेमी,त्यांचे चाहते व नागरीकांनी मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन त्यांचा शिष्य परिवार व कलावैभव संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145