Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jun 6th, 2020

  लग्नाची पद्धतच बदलली; ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका!

  नागपूर : कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे. लग्न समारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची नियमावली केली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले असून नागपुरात १०० पेक्षा जास्त कॅटरर्सने ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका घातला आहे. लग्न पुढे न ढकलता ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा अनेकांनी अवलंब केला आहे.

  लग्नसमारंभ, वाढदिवस आणि लहानमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मंगल कार्यालयाच्या संचालकांनी पॅकेज तयार केले आहेत. ठराविक पॅकेजमध्ये ५० जणांचे मिठाईसह रुचकर जेवण, जागेची उपलब्धता, हॉलचे सॅनिटायझेशन, हॅण्डग्लोव्हजची उपलब्धता, सजावट आदींचा पॅकेजमध्ये समावेश आहे. ५० पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगीसाठी कुणीही पुढे येत नसल्याची माहिती आहे.

  खंगार कॅटरर्सचे चंद्रकांत खंगार म्हणाले, लग्नसमारंभ आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी अनेक मंगल कार्यालय आणि लॉन संचालकांशी बोलणी केली आहे. ५० जणांसाठी संपूर्ण सुविधेसह विशेष पॅकेज तयार केले आहे. पॅकेज तयार करून महिना झाला आहे. पण सध्या कुणीही ग्राहक आले नाही. लग्नसमारंभाच्या तारखा आता नाहीत. दिवाळीत साजरे होतील. जगदंबा कॅटरर्सचे बंडू राऊत म्हणाले, मार्च ते मे महिन्याचा लग्नाचा हंगाम कोरडा गेला आहे. थोडक्यात कार्यक्रम साजरे करण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. तीन महिन्यात केवळ ९ हजाराचे उत्पन्न झाले.

  मानसिकता बदलणे गरजेचे
  नागपुरात लग्नापूर्वी साक्षगंध आणि हळदीचे कार्यक्रम तसेच वाढदिवस असले तरीही किमान २५० ते ३०० जणांची उपस्थिती असते. नातेवाईक आणि मित्रमंडळी ५०० च्या आसपास असतात. त्यामुळे ५० जणांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम कसे साजरे करणार, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरही प्रशासन २०० ते ३०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देईल. अशा स्थितीतही नागपूरकरांचे कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनामुळे कार्यक्रम आयोजनाचे स्वरुप बदलल्याचा सूर नागपूरकरांनी काढला.

  लग्नासाठी नियम
  केवळ ५० जणांच्याच उपस्थितीत होणार लग्न ५० पेक्षा अधिक लोक आढळल्यास, लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई होणार लग्न समारंभात सॅनिटायझेशन व फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक

  Stay Updated : Download Our App

  Mo. 8407908145
  0Shares
  0