Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 4th, 2017
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  मंत्रालयात अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

  मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “क्लॅप” देऊन आज माहिती व जनसंपर्क महासंचानलयाच्या अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओचे उदघाटन केले.

  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या कार्यकक्षा उत्तमरीत्या विस्तारल्या असून स्टुडिओमुळे महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधणे शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, संचालक प्रशासन अजय अंबेकर, संचालक वृत्त देवेंद्र भुजबळ, संचालक माध्यम समन्वय शिवाजी मानकर यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अत्याधुनिक स्टुडिओची निर्मिती केली आहे. या स्टुडिओमुळे सर्व सामान्य जनतेला आपले प्रश्न शासनापुढे मांडण्यासाठी तसेच शासनाला आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सशक्त असे दृकश्राव्य संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

  नवीन स्टुडिओ मध्ये आत २४ व मंत्रालय गेटबाहेर १६ कनेक्टिव्हिटी पोर्टस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत.. त्यामुळे इतर वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनसना इनपूट देणे शक्य होईल. जयमहाराष्ट्र – दिलखुलास हे महासंचालनालयाचे कार्यक्रम मंत्रालयातच ध्वनीचित्रमुद्रित करणे या स्टुडिओमुळे शक्य होणार आहे. स्टुडिओत क्रोमा, क्रु टेक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे.

  माहिती जनसंपर्ककडून नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी
  आपल्या प्रास्ताविकात महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यावर्षी डिजिटल आणि व्हिज्युअल प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. ट्व्टिर , फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक समाज माध्यमांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कार्य विस्तार झाला आहे. आजमितीस महासंचालनालयाचे १०,५०० हून अधिक ट्व्टिर फॉलअर्स आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून सध्या २८ लाख लोकांना मोबाईल संदेशद्वारे शासनाचे निर्णय व बातम्या यांची माहिती पाठवली जाते. लवकरच हा डेटाबेस १ कोटी पर्यंत वाढवण्याचा महासंचालनालयाचा मानस आहे. मुंबईत डिजीटल होर्डिंग्ज, सुराज्य रथ यासारखे नवीन उपक्रम महासंचालनालय हाती घेणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती यावर्षी पूर्ण करण्यात येईल. महासंचालनालयाने डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिमही सुरु केली असल्याने विषयवार बातम्या आणि लेख यांचा संग्रह करणे, शोध घेणे आता शक्य होईल, असेही ते म्हणाले.

  “मी मुख्यमंत्री बोलतोय” या कार्यक्रमातून जनतेशी साधल्या जाणाऱ्या संवादासाठी राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ चार दिवसात १८ हजार प्रश्न व्हॉटसॅपवर तसेच १२५० प्रश्न ईमेल वर प्राप्त झाले असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

  महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना “मी मुख्यमंत्री बोलतोय” या कार्यक्रमाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी चित्रफीत ही दाखवण्यात आली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145