Published On : Thu, Feb 20th, 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

जामीन मिळताच फडणवीस कोर्टाबाहेर येऊन म्हणाले, ‘यामागे कोण आहे, त्याची पूर्ण जाणीव’

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना निर्माण झालेल्या केसेस आहेत. यामागे कोण आहे, हे मला माहित आहे, योग्य वेळी बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी सुनावणीनंतर (Devendra Fadnavis after Bail) दिली.

2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपुरातील JMFC न्यायालयात सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस यांना अखेर आज कोर्टात हजर राहावंच लागलं. कोर्टाने फडणवीसांना 15 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी 30 मार्चला होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना स्थानिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फडणवीस आज हजर झाले. त्यासाठी ते काल रात्रीच नागपुरात पोहोचले होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘1993 ते 1998 च्या दरम्यान एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात एक आंदोलन केलं, त्यासंदर्भात दोन खाजगी तक्रारी माझ्याविरुद्ध टाकण्यात आल्या होत्या. समेट झाल्याने आता त्या संपल्या आहेत, मात्र त्या प्रतिज्ञापत्रात नमूद न केल्याने माझ्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. मी कनिष्ठ कोर्टात जिंकलो, सेशन्स कोर्टाने तो निर्णय कायम ठेवला. पुढे सुप्रीम कोर्टाने ती पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे पाठवली. आज कोर्टाने हजेरीसाठी समन्स बजावलं होती. मी हजर राहिलो, वैयक्तिक जातमुचलका देऊन मला जामीन देण्यात आला.’ असं फडणवीस म्हणाले.

‘माझ्यावरील केसेस आंदोलनाच्या आहेत. त्या लपवण्याचं कुठलंही कारण नव्हतं, वकिलांच्या निर्णयानुसार मी प्रतिज्ञापत्र भरलं. कलम 125 प्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी लपवण्यासारख्या त्या केसेस नव्हते. मी दोन्ही वेळा 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकलो आहे. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना निर्माण झालेल्या केसेस आहेत. केस कोर्टात असल्याने अधिक बोलणार नाही. यामागे कोण आहे, हे मला माहित आहे, योग्य वेळी बाहेर येईल.