Published On : Thu, Mar 19th, 2020

नमस्कार! मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय….

आयुक्तांच्या आवाजातून संपूर्ण शहरात ‘कोरोना’बाबत जनजागृती

नागपूर : ‘नागपूरकरांनो, नमस्कार! मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय. सुरक्षितता हाच कोरोनापासून बचावाचा उपाय आहे. कोरोनाला घाबरू नका, सतर्क राहा. हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा….’ हे शब्द आता नागपूरकरांना घनकचरा संकलन गाड्यांवरून ऐकायला येणार आहेत.

नागपुरात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यावर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात शासनाच्या दिशानिर्देशानुसार कार्य सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्या, हा संदेश गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या वतीनेही माध्यमे, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याची मोहीम सुरू आहे.

दरम्यान, दररोज सकाळी आणि दिवसभर नागपूरकरांच्या घरासमोर मनपाची घनकचरा संकलन गाडी येते. ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’ हे गाणे सध्या प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. हे गाणे घराघरांत पोहचविण्यात मनपाच्या स्वच्छतादूतांची अर्थात घनकचरा संकलन गाड्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणूनही या स्वच्छतादूतांकडे बघितले जात आहे. ही बाब लक्षात घेता, कोरोनाबाबत नागरिकांना प्रभावी संदेश द्यायचा असेल तर घनकचरा संकलन गाडी हे उत्तम माध्यम ठरेल, हे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न घालवता स्वत: ‘कोरोना’ जनजागृती संदेशाचे रेकॉर्डिंग केले असून ‘मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे…’ ही सुरुवात आणि त्यांचा संदेश शुक्रवार २० मार्चपासून नागपूर शहरात पोहचणार आहे. तसेच नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील निरनिराळया भागात प्रमुख ५१ चौकाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक उदघोषणा यंत्रणे मार्फत (PAS) देखील आयुक्तांचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी हा संदेश ऐकावा, त्यावर अंमल करावा आणि इतरांनाही संदेशाचा भावार्थ सांगावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.