| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 18th, 2020

  झिरो माईल-विद्यापीठ डी.पी. रस्त्याचे काम पूर्ण करा!

  – स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर यांचे निर्देश

  नागपूर– झिरो माईल मेट्रो स्टेशन ते विद्यापीठ कार्यालयापर्यंत असलेल्या डी.पी. रस्त्याचे रखडलेले काम तातडीने आणि महराजबाग समोरील रस्त्यावरील पुलाचे काम पुढील १५ दिवसात पूर्ण करा, असे निर्देश मनपाचे स्थापत्य समितीचे सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

  सभापती अभय गोटेकर यांनी गुरुवारी (ता. १७) या दोन्ही कामांची पाहणी करत या कामांना होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संजय बंगले, रूपा राय, उज्वला शर्मा, सुनील हिरणवार, मनपा लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हान, उपअभियंता मनोज गद्रे उपस्थित होते.

  झिरो माईल-विद्यापीठ डी.पी. रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम शिल्लक आहे. त्याला कारण म्हणजे झिरो माईल मेट्रो स्टेशनमुळे नियोजनात काही बदल झाल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. केवळ ११० मीटरचे बांधकाम अडलेले आहे, यावर नाराजी व्यक्त करीत सोमवारी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश श्री. गोटेकर यांनी दिले.

  यानंतर त्यांनी महाराज बाग जवळ तयार होत असलेल्या पुलाची पाहणी केली. ह्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे, असे रूपा राय यांच्यासह अन्य नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. कामाच्या संथगतीवर नाराजी व्यक्त करीत पुढील १५ दिवसात काम पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145