Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 15th, 2020

  पाणी बिलावरीलही शास्ती होणार माफ

  जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांची माहिती

  नागपूर : मालमत्ता कर संदर्भातील ‘अभय योजने’प्रमाणेच थकीत पाणी बिल संदर्भातही मनपातर्फे योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार पाणी बिलावरीलही शास्ती माफ केली जाईल, अशी माहिती मनपाचे स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त श्री.राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  मंगळवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथील आयुक्त सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराचे महापौर संदीप जोशी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून जुळले होते. पत्रकार परिषदेत कार्यकारी महापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर उपस्थित होते.

  यासंबंधी माहिती देताना विजय (पिंटू) झलके यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे मालमत्ता कर आणि पाणी कर हेच आहे. मात्र कोव्हिड-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये लॉकडाउन लागले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशा स्थितीत लोकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. हळुहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांसाठी मनपाही दिलासादायक पुढाकार घेत आहे. कर संबंधी ‘अभय योजना’ लागू करून मनपा प्रशासनाद्वारे त्याची प्रचिती देण्यात आली. ‘वन टाईम सेटलमेंट’ हीच योजना पाणी बिल संदर्भात लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आला होता. मनपा अर्थसंकल्पमध्येपण याला समाविष्ट करण्यात आले होते. त्यावर प्रशासनामार्फत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २१ डिसेंबर २०२० पासून पाणी बिल संदर्भात ‘अभय योजना’ लागू केली जाईल. २२ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत म्हणजे दोन महिने या योजनेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

  नागपूर महानगरपालिकेचे एकूण ३ लाख ७२ हजार पाणी बिलाचे ग्राहक आहेत. यापैकी २ लाख ५७ हजार ग्राहकांकडे २१२.६७ लक्ष एवढी थकबाकी आहे. त्यापैकी ९८.५१ कोटी रुपये मुद्दल रक्कम असून ११४.१६ कोटी रुपये शास्ती आहे. जलप्रदाय विभागाच्या ‘अभय योजने’अंतर्गत २१ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ पर्यंत थकीत पाणी बिल धारकांनी बिल भरणा केल्यास त्यांना १०० टक्के शास्ती माफ केली जाईल. यानंतर ज्या उपभोक्त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही अश्या उपभोक्त्यांना २२ जानेवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या योजनेत सहभागी होता येईल. मात्र त्यांना ७०% शास्ती माफ करण्यात येईल. ही योजना दोन महिन्यासाठी अस्तित्वात राहील आणि २२ फेब्रुवारी २०२१ ला रात्री १२ वाजता संपुष्टात येईल. थकीत पाणी बिल धारकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपले पाणी बिल भरून थकबाकीदारांच्या यादीतून आपले नाव कमी करावे, असे आवाहन जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145