| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 15th, 2021

  १६ जानेवारीपासून नागपूरात लसीकरणाची सुरुवात

  नागपूर: नागपूर शहरात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोव्हिड लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी २२ हजार लस पोहोचल्या आहेत. यामध्ये नोंदणी झालेल्या साडे बावीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची सुरुवात ५ केन्द्रावरुन शनिवारी सकाळी होणार आहे. या केन्द्रामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स आणि मनपाचे पाचपावली सुतिकागृह समाविष्ट आहे. महापौर श्री.दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. या केन्द्रांना शनिवारी (ता.१६) ला भेट देणार आहे.

  अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, मनपातर्फे प्रत्येक केन्द्रावर दररोज १०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, आंगनवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केन्द्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचरी व पोलिस कर्मचारी तैनात राहतील.

  लसीकरण केन्द्रात लस लावण्यापूर्वी कर्मचा-यांच्या नावाची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांचे तापमान घेऊन सॅनीटाइज करुन प्रतीक्षागृहात त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लसीकरण करण्यापूर्वी त्यांची ओळख पटविल्यानंतर कोव्हिड पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जाईल. लसीकरण केल्यानंतर त्यांना अर्धातास निरीक्षण कक्षामध्ये बसावे लागेल.

  ऐच्छिक व नि:शुल्क लस
  ‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145